पुण्यातील ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार; अतिदक्षता विभागातील रुग्णाला उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यातल्या ससून या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. उंदीर चावल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासनावर धारेवर धरत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. यामुळे ससून रुग्णालयाचा ढिसाळ नियोजनाचा चेहरा पुन्हा एकदा समोर आले आहे
सागर रणूसे हा ३० वर्षांचा तरुण पुणे येथील ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल झाला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागा उपचार सुरु होते. त्याची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत असताना २६ मार्च रोजी अचानक त्याची प्रकृती पुन्हा खालावू लागली. अचानक प्रकृती खालावू लागल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांमध्येही काळजी निर्माण झाली. रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सागर याची प्रकृती खालावत असताना त्याची मामी त्याला भेटायला गेली. या वेळी रुग्णाने तिला सांगीतले की, रात्री मला उंदीर खूप चावले. मला उंदीर चावत असल्याचे कळत होते. मात्र, शारीरिक हालचाल करता येत नसल्याने मला काहीच करता आले नाही. मी डॉक्टरांना आवाज द्यायचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकला नाही. रुग्णाने प्रत्यक्ष माहिती दिल्यानंतर त्याच्यासोबत नेमके काय घडले याचा आम्हाला अंदाज आल्याचे रुग्णाचे नातेवाईक म्हणाले.
दरम्यान, उंदीर चावल्यामुळे उद्भवणारे लेप्टोपायरसीस आणि इतर आजारामुळेच सागरचा मृत्यू झाला असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. या सर्व प्रकरणानंतर ससून रुग्णालया विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात लक्ष घालत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.