महाभयंकर ! पुणे बनले ड्रग्ज कॅपिटल… ११०० कोटींचे एमडी जप्त
पुणे – पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी दिवसभरामध्ये केलेल्या कारवायांमध्ये तब्बल ६०० किलो पेक्षा अधिक मेफॅड्रोनचा साठा जप्त करण्यात आला आहे. ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे मेफेड्रोन पोलिसांनी जप्त केले आहे. विश्रांतवाडी येथील भैरव नगरमध्ये असलेल्या एका गोदामामधून ५५ किलो, कुरकुंभ एमआयडीसीमधील एका फॅक्टरीमधून ५०० किलोच्या आसपास साठा करून ठेवण्यात आलेला होता. या ठिकाणी एमडीची निर्मिती केली जात होती. अटक केलेल्या तिघा आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या मेफेड्रोनची निर्मिती दौंड येथील कुरकुंभ मधील एका कारखान्यामध्ये केली जात असल्याचे देखील समोर आले आहे. आतापर्यंत तब्बल 1 हजार १०० कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
वैभव उर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करोसिया (वय ३५) आणि हैदर नूर शेख (वय ४०, रा. विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. या कारखान्यामध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला असून त्या ठिकाणी देखील तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. यासोबतच मुंबईमधील पॉल आणि ब्राऊ नावाच्या दोन ड्रॅग पेडलर अर्थात ड्रग्ज विक्रेत्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे. पुण्यात जप्त केलेले मेफेड्रोन या दलालांमार्फत संपूर्ण देशभरामध्ये आणि विदेशात वितरित केले जाणार होते. त्या दोघांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथके मुंबई आणि दिल्लीला रवाना करण्यात आलेली आहेत. हैदर याने भाड्याने घेतलेल्या विश्रांतवाडी मधील या गोदामामध्ये मीठ आणि रांगोळीचा साठा करून ठेवण्यात आलेला होता. पांढऱ्या क्रिस्टल्स प्रमाणे दिसणारे मेफेड्रोन हे छोट्या छोट्या पाकिटांमध्ये भरून ही पाकिटे मिठाच्या मोठ्या पाकिटांमध्ये लपवली जात होती.
जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत ही ७५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखेनं छापा टाकून हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.कोणालाही संशय येऊ नये यासाठी मिठाच्या पुड्यातून ड्रग्सच्या पावडरची विक्री सुरू होती. या प्रकरणाचा पुणे गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. या ड्रग्स रॅकेट प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे, घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.