काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल
मुंबई – आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या भाजपा कार्यालयात हा सोहळा पार पडला. यानंतर अशोक चव्हाण यांनी आपण आता भाजपासाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार आहोत असं म्हटलं आहे. तसंच भाजपात मी कुठल्याही पदासाठी आलो नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा देईल ती जबाबदारी स्वीकारुन पूर्णपणे विकासासाठी काम करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपात येण्याचा निर्णय का घेतला याचंही उत्तर दिलं आहे. अशोक चव्हाण यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी बोलताना ते म्हणाले, विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस नेहमी सकारात्मक राहिले, आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू.
विरोधात आणि सत्तेत असताना देखील आमचे राजकारणापलीकडे सबंध होते. विकासाची राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिलीय. गेल्या ३८ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतोय, असे चव्हाण म्हणाले. तसेच ,मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नाही. सभागृहात विरोधी भूमिका मी प्रमाणिकपणे केली. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी सबंध होते ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करीन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही. मी अधिक भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलीन, असे अशोक चव्हाण म्हणाले.