खळबळ ! बोरिवली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासहित तिघांवर गुन्हा दाखल
मुंबई – बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक अशा तिघांवर न्यायालयाच्या आदेशाने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुधीर कालेकर,अरविंद घाग व स्वप्नाली मांडे अशी या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात त्याचे पती व सासरच्या लोकांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादी यांचे स्त्रीधन हस्तगत करून देण्याकरिता तसेच गुन्ह्यात तक्रारदार यांचा १६४ (५) (अ) अन्वये न्यायालयात जबाब नोंद करण्याकरिता आणि आरोपीना कडक शासन होण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्यावतीने पोलीस उपनिरीक्षक यांनी ५,००,०००/- रु.लाचेची मागणी करून त्यातील २,२५,०००/- रु. स्वीकारले असा तक्रार अर्ज फिर्यादी यांनी या तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्याकरिता न्यायालयात सादर केला असता,न्यायालयाने सीआरपीसी कलम १५६ (३) प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक यांच्याविरुद्ध कलम ७,भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तिघांविरुद्ध एम.ई. सी.आर ०४/२०२४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.