दुचाकी चोरांना अटक ; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई
प्रकाश संकपाळ
डोंबिवली – डोंबिवली व कल्याण परिसरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला आहे, त्यांच्यावर पोलीस कारवाई करून देखील दुचाकी चोरीच्या घटना वारंवार होताना दिसतात. अशीच एक घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दुचाकी चोरणाऱ्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. अटक करण्यात आलेल्या सुभाष जोशी उर्फ जे.पी. व विक्रम चव्हाण अशी दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवलीत राहणारे सुशांत पालकर यांची पार्किंगमध्ये असणारी मोटरसायकल चोरी झाली असल्याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने कल्याण गुन्हे शाखेकडून तपास सुरू असताना पोलीस अंमलदार सचिन वानखेडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱयांचा मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सांगरली, डोंबिवली पूर्व परिसरातून या दोघांना अटक करून त्यांच्याकडून मोटरसायकल हस्तगत करण्यात आली.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.