जुन्या भांडणाचा राग धरून अल्पवयीन मुलाची अपहरण करून हत्या, पळून जाण्याचा तयारीत असतानाच पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

जुन्या भांडणाचा राग धरून अल्पवयीन मुलाची अपहरण करून हत्या, पळून जाण्याचा तयारीत असतानाच पोलीसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – एका व्यक्तीने मित्राच्याच दहा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उरणमधून समोर आली आहे. उरण तालुक्यातील चिर्ले गावात राहणाऱ्या बिंदू राम अजोर – ३३ यांनी मोठ्या विश्वासाने आपल्या मुलाला शेजारीच राहणाऱ्या कांताराम सिताराम यादव याच्यासोबत घरी पाठवलं. मात्र, पुढे जे घडलं, ते अतिशय भयानक होतं. बिंदू राम हे पत्नी आणि एकुलता एक असलेला दहा वर्षांचा मुलगा हर्षसह मढवी यांच्या चाळीत भाड्याने राहतात. मात्र, पत्नी गावी गेल्यावर मुलगा आणि ते दोघेच घरी होते. बिंदू हे वाहनचालक असल्याने त्यांच्या घरी येण्याच्या वेळा ठरलेल्या नाहीत. त्यामुळे कामासाठी बाहेर पडल्यावर घरात मुलगा एकटाच राहात असल्याने बिंदू मंगळवारी मुलाला सोबतच घेऊन कामावर गेले होते. मात्र वाहनातून मालाची डिलिव्हरी करण्यासाठी गेले असता ग्लोबल लॉजिस्टिक्स टर्मिनलमध्ये लहान मुलाला प्रवेश देण्यास सुरक्षा रक्षकांनी नकार दिला.

इतक्यात बिंदू यांना शेजारीच राहणारा कांतीराम दिसला. बिंदू यांनी १० वर्षीय हर्षला कांतारामकडे दिलं आणि घरी सोडण्यास सांगितलं. काम झाल्यानंतर हर्ष घरी पोहोचला का हे पाहण्यासाठी बिंदू यांनी कांतारामला फोन केला. मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही. बिंदू यांनी लगेचच घर गाठलं. मात्र, कांताराम आणि हर्ष दोघंही तिथे नव्हते. त्यांनी रात्रभर मुलाचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी खोपटा -पोगोटे रिलायन्स या कोस्टल रोडवरील खाडीत येथील सुरक्षा रक्षकाला हर्षचा मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेचच उरण पोलिसांना माहिती दिली. उरण पोलीस पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. धारदार शस्त्राने हर्ष याचा गळा चिरून हत्या करून मृतदेह खाडीत टाकला असल्याचं आढळून आलं. तांत्रिक मदतीने पोलिसांनी संशयित आरोपी कांतारामला पलायनाच्या तयारीत असतानाच ताब्यात घेतलं. चौकशीत जुन्या भांडणाचा राग धरून हर्षची हत्या केली असल्याची कबुली आरोपीनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon