नाशिकमध्ये दीड लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

नाशिकमध्ये दीड लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे यांना अटक

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक संशयित डॉ. तेजस मदन गर्गे व नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१,रा.अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाख रूपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. तेजस गर्गे यांनी लाचेच्या रकमेमधून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.

तक्रारदार यांना कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक सहायक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. यासाठी तक्रारदार यांनी सरकारवाड्याच्या प्राचीन वास्तूत कार्यरत असलेल्या सहायक संचालक पुरातत्व व संग्रहालय यांच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र तक्रारदार यांना देण्याच्या मोबदल्यात पुरातत्व विभाग नाशिक येथील सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांनी सोमवारी (दि.६) १ लाख ५०हजार रूपये लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे-वालावलकर यांच्या आदेशान्वये सापळा रचण्यात आला. तडजोडअंती एवढीच लाचेची रक्कम मंगळवारी स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक एन. बी.सूर्यवंशी, व सुवर्णा हांडोरे यांनी आळे यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यानंतर आळे यांनी पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस मदन गर्गे यांना लाच स्वीकारल्याची माहिती सांगून त्यांचे हिश्याचे पैसे कोणाकडे देऊ बाबत कळविले असता त्यांच्या हिश्याची रक्कम त्यांनी स्वीकारण्याची संमती दर्शवली. यामुळे गर्गे यांच्याविरूद्धही इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon