नशेबाज ३ महिलांची अश्लील शिवीगाळ करत महिला पोलिसांना बेदम मारहाण; एक दिवसाची पोलिस कोठडी

Spread the love

नशेबाज ३ महिलांची अश्लील शिवीगाळ करत महिला पोलिसांना बेदम मारहाण; एक दिवसाची पोलिस कोठडी

योगेश पांडे / वार्ताहर 

पालघर – पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत तीन महिलांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. विरार पश्चिममध्ये असलेल्या गोकुळ टाऊनशिप येथील पंखा फ़ास्ट रेस्टॉरंट आणि बारमध्ये ही घटना घडली आहे. महिलांनी दारूच्या नशेत महिला पोलिसांना चावा देखील घेतला. या तीनही महिलांना अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विरार पश्चिमेला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये महिला दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचा फोन आल्यानंतर महिला पोलीस अंमलदार उत्कर्षा वंजारी व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र उलट दारूच्या नशेत असलेल्या या महिलांनीच पोलिसांशीच वाद घालण्यास सुरुवात केला.

यातील एका २२ वर्षीय आरोपी महिलेनं उत्कर्षा वंजारी यांचा गणवेश पकडून त्यांना खाली ओढले, त्यानंतर त्यांना धक्काबुक्की केली. तिच्या तावडीतून सुटका करत असताना आरोपी महिलेनं त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला आणि कोपराला जोरात चावा घेतला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने पोलीस अधिकारी उत्कर्षा यांचे केस धरून ओढले. उत्कर्षा यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या रेस्टॉरंटमधील कर्मचारी आकांक्षा भोईर यांना देखील या महिलांनी मारहाण केली. तिसऱ्या आरोपी महिलेनं देखील शिविगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर वाद सोडवण्यासाठी गेलेल्या हवालदार मोराळे यांना देखील या महिलांनी मारहाण केली आहे. त्यांच्या डोक्यात लोखंडी बादलीने हल्ला केला. या घटनेत ते जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या हाताला देखील चावा घेतला. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon