मुंबईच्या बीकेसीत सापडला बनावट नोटा छापण्याचा कारखाना, दोघांना अटक

Spread the love

मुंबईच्या बीकेसीत सापडला बनावट नोटा छापण्याचा कारखाना, दोघांना अटक

योगेश पांडे – वार्ताहर 

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यभरात बेनामी रोकड सापडण्याच्या घटना समोर येत असतानाच आता मुंबईतून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. येत्या २० मे रोजी मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या मुंबईत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. ही सगळी धामधुम सुरु असताना मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री बीकेसी परिसरातील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरातील या कारखान्यात बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. या कारखान्यात ५,१०,१०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदाचा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी नौशाद शाह आणि अली सय्यद या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांकडून या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. या बनावट नोटा तयार झाल्यानंतर कुठे वितरीत केल्या जात होत्या, या सगळ्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबई उपनगरमधील भांडूप परिसरात पोलिसांनी साडेतीन कोटींची रोकड असलेली एक गाडी पकडली होती. मात्र,निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ही एटीएम व्हॅन असल्याचे समोर आले होते. या गाडीच्या चालकाकडे पुरेशी कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांना संशय आला होता. त्यामुळे ही एटीएम व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली होती. मात्र, चौकशीनंतर ही व्हॅन सोडून देण्यात आली होती. तसेच सायन परिसरातही पोलिसांनी कारवाई करत एका कारमधून १ कोटी ८७ लाख ८० हजार रुपये जप्त केले होते. आयकर खात्याला याबाबत कळवण्यात आले होते. याशिवाय, दादरच्या शिंदे वाडी परिसरातून लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.

निवडणूक काळात पैशांच्या अवैध वाहतुकीवर निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेली भरारी पथकं लक्ष ठेवून आहे. निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. त्यासाठी मुंबई शहर, उपनगर तसेच मुंबई लगतच्या शहरांच्या वेशीवर नाकाबंदी करण्यात आली असून गाड्यांची तपासणी सुरु आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. या काळात मतदारांना पैशांचे वाटप होत आहे का, याकडे निवडणूक आयोग आणि पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon