किराणा दुकानामध्ये कल्याण गुन्हे शाखेची धाड; अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त, एक आरोपी अटकेत तर दुसरा फरार

Spread the love

किराणा दुकानामध्ये कल्याण गुन्हे शाखेची धाड; अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त, एक आरोपी अटकेत तर दुसरा फरार

योगेश पांडे / वार्ताहर

डोंबिवली – अंबरनाथ तालुक्यातील मलंगड भागात नेवाळी गावातील एका किराणा दुकानावर छापा टाकून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार कोटी रुपये किमतीचा तीन किलो वजनाचा मॅफोड्रोन नावाच्या अंमली पदार्थांचा साठा हस्तगत केला. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेश कुमार प्रेमचंद तिवारी याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार शैलेंद्र अहिरवार हा फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या तस्करांनी अंमली पदार्थाचा साठा कुठून आणला. हे अंमली पदार्थ ते कुणाला विकत होते. या रॅकेटमध्ये किती जणांचा सहभाग आहे. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात अंमली पदार्थांची तस्करी वाढत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलीस तस्करांच्या मागावर होते. काटई-बदलापूर पाईपलाईन छेद रस्त्यावरील कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या नेवाळी गावात गायत्री किराणा दुकानामध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा दडवून गुप्त पद्धतीने विक्री करण्यात येत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना गुप्तहेरांकडून मिळाली होती. नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक नेवाळी गावातील गायत्री किराणा दुकानात अचानक घुसले. दुकानाची झडती घेताना पथकाच्या हाती दुकानात ३ किलो ४ ग्रॅम वजनाचा मॅफोड्रोनचा साठा आढळून आला. पथकाने दुकानाचा चालक राजेश कुमार तिवारी याला अटक केली. राजेश हा कटाई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या धामटण गावातील एकविरा ढाब्याजवळ राहतो. राजेशचा साथीदार शैलेंद्र अहिरवार हा कारवाईनंतर फरार झाला आहे. शैलेंद्र अहिरराव हा ठाण्यातील ढोकळी-कोलशेत परिसरात राहतो. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

राजेश तिवारी आणि शैलेंद्र अहिरराव हे दोघेही अंमली पदार्थांच्या विक्री व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांचाही उत्तरप्रदेशसह महाराष्ट्रातही अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू आहे. किराणा दुकानाच्या नावाखाली राजेश तिवारी याच्या अंमली पदार्थांच्या विक्रीचा धंदा जोरात सुरु होता. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४.५० कोटी आहे. डोंबिवली एमआयडीसीतील काही किराणा दुकानांच्या समोर दिवसभर तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशी ठिकाणे शोधून पोलिसांनी तेथेही कारवाई सुरू करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. एमआयडीसीतील एका प्रसिद्ध रुग्णालय समोरील गल्लीत हा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon