पैशाचा पाऊस पाडतो सांगून भोंदू बाबाने तरुणाचे पळवले १८ लाख रुपये

Spread the love

पैशाचा पाऊस पाडतो सांगून भोंदू बाबाने तरुणाचे पळवले १८ लाख रुपये

पुणे – अठरा लाखांचे पाच कोटी रूपये करून पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगणाऱ्या भोंदू बाबासह चार जणांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ससाणेनगर काळेपडळ रस्त्यावर एक महिन्यापूर्वी ही घटना घडली होती. विनोद छोटेलाल परदेशी (वय ४० रा. हडपसर) यांनी त्याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित भोंदूबाबा आयरा शाब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य (सर्व रा. बदलापूर, ठाणे), किशोर पांडागळे (रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी, पुणे) या चार जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, एका मध्यस्थीने फिर्यादीला अठरा लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. बाबा त्याचे ५ कोटी रुपये करून देतील, असेही त्याने सांगितले. त्यानुसार पैशाच्या अमिषा पोटी तब्बल १८ लाख रुपये बँकेतून काढून फिर्यादीने महाराजांसमोर ठेवले.

महाराज लिंबू हातात घेऊन विधी करत होता. दरम्यान, अचानक त्याठिकाणी पोलीसांसह चार-पाच इसम आले. ते १८ लाख रुपये घेऊन निघून गेले. काही वेळातच आलेले पोलिस बनावट असल्याचे समजले. त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केला मात्र, त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी दिली. आता फिर्यादीने १८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी ढोंगी बाबा व त्यांचे साथीदारांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हडपसर पोलिसांनी पैशाचा पाऊस पाडून १८ लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करतो, असे सांगणाऱ्या संबधित बाबासह रोकड लंपास करणाऱ्या त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon