विश्वास आणि प्रेमाच्या नात्याला काळिमा; टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत!
गर्लफ्रेंडला घरी बोलावून रात्रभर बेदम मारहाण, डोक्यात टीव्ही आणि पाण्याचा भरलेले हंडे मारून हत्या; आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण आंबिवली बनेलीमधून एक धक्कादायक घटना समोर आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून ‘लिव्ह-इन’ पार्टनरची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नेहमी मारहाण करतो म्हणून आईकडे राहण्यास गेलेल्या २२ वर्षे तरुणीला आता मारणार नाही” म्हणून प्रेमाने बोलावले आणि आरोपी तिच्यावर काळ बनून धावल्याची घटना घडली आहे. रात्रभर बेदम मारहाण करत तिच्या डोक्यात टीव्ही आणि पाण्याचा भरलेले हंडे मारून हत्या केली. रुक्सार अन्सारी असे मयत तरुणीचे नाव तर सतीश उर्फ गुड्डू वाघे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता हत्येनंतर आरोपी देखील रुग्णालयाबाहेरच बिनधास्त फिरत होता, अखेर संतप्त कुटुंबीयांनी त्याला चोप देत टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला कठोर कारवाई करा अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे.
आंबिवली परिसरातून ही सुन्न करणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्या २२ वर्षांच्या प्रेयसीची अत्यंत क्रूरपणे मारहाण करत हत्या केली आहे. रुक्सार अन्सारी असं या दुर्दैवी मृत तरुणीचं नाव असून, सतीश उर्फ गुड्डू वाघे असं हत्या करणाऱ्या नराधम आरोपीचं नाव आहे. चारित्र्यावर संशय घेत आरोपीने रुक्सारला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता घरातला टीव्ही आणि पाण्याने भरलेला तांब्याचा हंडा तिच्या डोक्यात मारून तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. या घटनेनंतर गंभीर जखमी रुक्सारला घेऊन तिचे नातेवाईक आधी टिटवाळा आणि नंतर उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात पळाले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. संतापजनक बाब म्हणजे हत्येनंतर रुग्णालयाबाहेर फिरणाऱ्या या नराधम आरोपीला मुलीच्या नातेवाईकांनी पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. सध्या याप्रकरणी टिटवाळा तालुका पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
विश्वास आणि प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आंबिवली परिसरात घडली. मयत रुक्सार अन्सारी आणि आरोपी सतीश उर्फ गुड्डू वाघे हे दोघे गेल्या २ ते ३ वर्षांपासून ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये एकत्र राहत होते. मात्र, काही दिवसांपासून सतीश रुक्सारच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दोन दिवसांपूर्वीच त्याने तिला जबर मारहाण केली होती, ज्याला कंटाळून रुक्सार आपल्या आई-वडिलांच्या घरी निघून आली होती. काल सायंकाळी आरोपी सतीशने “मी तुला पुन्हा मारणार नाही, आपण प्रेमाने संसार करू” असं खोटं सांगून रुक्सारला विश्वासाने आपल्या घरी बोलावून घेतलं.
मात्र, पहाटेच्या सुमारास त्याचा पुन्हा संशय बळावला. सतीशने रुक्सारला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रुक्सार जिवाच्या आकांताने ओरडत असताना नराधम सतीशने घरात असलेला टीव्ही आणि पाण्याने गच्च भरलेला हंडा थेट तिच्या डोक्यात घातला. यामध्ये रुक्सार गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळली. रुक्सार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ सतीशच्या घराकडे धाव घेतली. तिला वाचवण्यासाठी नातेवाईकांनी आधी टिटवाळा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तिथे अत्यंत आवश्यक असलेला ‘ऑक्सिजन’ उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
या आरोग्य यंत्रणेच्या दिरंगाईमुळे कुटुंबाला तिला उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात आणावे लागले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच रुक्सारचा मृत्यू झाला होता.आपली मुलगी दगावल्याचे समजताच कुटुंबाचा धीर सुटला. याच दरम्यान आरोपी सतीश हा सेंट्रल रुग्णालयाच्या बाहेरच संशयास्पद रित्या घुटमळत असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. आपली मुलगी गेल्याच्या संतापातून कुटुंबीयांनी आरोपी सतीशला रुग्णालयाच्या आवारातच पकडून बेदम चोप दिला आणि त्याला टिटवाळा पोलिसांच्या स्वाधीन केले.सध्या याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी सतीश उर्फ गुड्डू वाघे याला ताब्यात घेतले असून तरुणीच्या घरच्यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या घटनेमुळे तरुण पिढीतील नातेसंबंध आणि क्रूरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून टिटवाळा परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.