३४ कोटींच्या हेरॉईनसह पाच जण जेरबंद; कल्याणमधील मुख्य पुरवठादार अखेर पोलिसांच्या ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-३ अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाने तब्बल ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपयांच्या हेरॉईन (गर्द) प्रकरणाचा पर्दाफाश करत मुख्य पुरवठादारासह पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण ९ किलो ७६८ ग्रॅम वजनाचा हेरॉईन जप्त करण्यात आला असून, कल्याण, मुंबई, नाशिक आणि इतर राज्यांपर्यंत पसरलेल्या अंमली पदार्थ साखळीचा मोठा भांडाफोड झाला आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३, कल्याण यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.
स्मशानभूमीजवळ संशयास्पद हालचाल; दोन जण ताब्यात
१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांचे पथक महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना सांगळेवाडी स्मशानभूमीजवळ दोन संशयित इसम दिसले. त्यांच्या पाठीवरील बॅगमुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी चौकशीसाठी पुढे जाताच दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना जागीच पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कासिम अब्दुल सत्तार वसईकर (रा. शहापूर) आणि कृष्णा नागप्पा हळेमणी (रा. सायन कोळीवाडा, मुंबई) यांचा समावेश आहे.
बॅगेत सापडले ९ किलोहून अधिक हेरॉईन
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत आरोपींकडून ९ किलो २३६ ग्रॅम वजनाचे हेरॉईन आणि ३९ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३२ कोटी ३२ लाख ९९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घरझडतीत आणखी सव्वा पाचशे ग्रॅम हेरॉईन
तपासादरम्यान आरोपी कासिम वसईकर याच्या शहापूर येथील घराची झडती घेण्यात आली. त्यामध्ये आणखी ५३१.६९ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत सुमारे १ कोटी ८५ लाख ८५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
त्यामुळे या संपूर्ण कारवाईत जप्त हेरॉईनचे एकूण वजन ९ किलो ७६८ ग्रॅमपर्यंत पोहोचले.
मुख्य पुरवठादार अमजद पठाण अटकेत
तपासाच्या धागेदोऱ्यांवरून हे हेरॉईन कल्याणमधील अमजद युसुफ पठाण याने पुरवल्याचे उघड झाले. अमजद पठाण हा मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पुरवठा साखळी चालवत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तो आरोपी गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा याला व्यावसायिक व्यवहारासाठी हेरॉईन उपलब्ध करून देत होता.
तसेच कासिम वसईकर आणि सद्दाम गफुर शेख हे दोघे अमजद पठाणकडून अंमली पदार्थ विविध व्यावसायिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पोलिसांनी गणेशन जंगमार याला ५ एप्रिल रोजी, तर सद्दाम शेख याला ६ एप्रिल रोजी अटक केली. मुख्य आरोपी अमजद पठाण याला २१ मे रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद
मुख्य आरोपी अमजद पठाण याच्यावर यापूर्वी खून, दरोडा, मोक्का, एनडीपीएस, शस्त्रास्त्र कायदा यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर ठाणे, मुंबई, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत.
तर कासिम वसईकर याच्यावर यापूर्वी तीन एनडीपीएस गुन्हे दाखल असून, सद्दाम शेख याच्यावर चोरी, जबरी चोरी आणि इतर गुन्ह्यांची नोंद आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.