राबोडी पोलिसांची झटपट कारवाई; अर्ध्या तासात चोरीची बॅग शोधून तक्रारदाराला परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : राबोडी पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्परता आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गाडीची काच फोडून चोरीस गेलेली लॅपटॉप व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग अवघ्या अर्ध्या तासात शोधून काढत तक्रारदाराला परत मिळवून दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने पार्क केलेल्या वाहनाची काच फोडून त्यामधील बॅग चोरून नेली होती. या बॅगेत लॅपटॉपसह महत्त्वाची कागदपत्रे असल्याने तक्रारदाराने तातडीने राबोडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्वरित तपासाची सूत्रे हलवली.
पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा माग काढला. अत्यंत जलद हालचाली करत अवघ्या अर्ध्या तासात चोरीस गेलेली बॅग शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर संबंधित बॅग तक्रारदाराच्या ताब्यात देण्यात आली.
राबोडी पोलिसांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.