उल्हासनगरमध्ये २१ किलो गांजा जप्त; ओडिसाहून अंबरनाथमध्ये पुरवठ्याचा संशय, तिघांना अटक

उल्हासनगरमध्ये २१ किलो गांजा जप्त; ओडिसाहून अंबरनाथमध्ये पुरवठ्याचा संशय, तिघांना अटक

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर : शहरातील गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान उल्हासनगर पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई करत तब्बल २१ किलो ५८४ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ९ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प क्रमांक १ परिसरातील अमरडाय कंपनीबाहेरील रस्त्यावर पेट्रोलिंग सुरू असताना एका संशयास्पद ऑटो रिक्षाकडे पोलिसांचे लक्ष गेले. पोलिसांनी रिक्षा (क्र. MH-05-CP-5555) थांबवून झडती घेतली असता, त्यामध्ये २१ किलो ५८४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी ८ लाख ६३ हजार ३६० रुपये किमतीचा गांजा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा तसेच तीन मोबाईल फोन असा एकूण ९ लाख ३५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी रिक्षाचालक हिदायतुल्ला बिसमिल्ला शेख (वय ५१, रा. अंबरनाथ) याच्यासह ओडिसा येथील बिकास बिकरम रणबैसा (वय २६) आणि सुधीर धरूबा रणबैसा (वय २७) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक चौकशीत जप्त करण्यात आलेला गांजा ओडिसा येथून अंबरनाथमधील ‘बाबू खान’ नावाच्या व्यक्तीला विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon