गोवंडी-चेंबूर परिसर ड्रग्समुक्त करण्यासाठी युवासेनेची मोहीम
रवि निषाद / मुंबई
मुंबई : गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूर, ट्रॉम्बे आणि मानखुर्द परिसर ड्रग्समुक्त करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी युवासैनिक सज्ज झाले असून संबंधित विभागांशी पत्रव्यवहारही करण्यात आल्याची माहिती युवासेना पदाधिकारी जैद सिराज शेख यांनी दिली.
जैद शेख यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह चेंबूर, गोवंडी, शिवाजीनगर, ट्रॉम्बे आणि मानखुर्द परिसराची पाहणी केली. या पाहणीत काही भागांत खुलेआम ड्रग्सची विक्री होत असल्याची माहिती समोर आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे स्थानिक तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असून परिसरातील गुन्हेगारी वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
“ड्रग्समुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ड्रग्स विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,” अशी मागणी शेख यांनी केली. तसेच, ड्रग्स पुरवठादारांवर तातडीने कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
युवासेनेतर्फे चेंबूरमधील कादरिया नगर, नागवाडी, गुलशन बाग, अमीर बाग, गोवंडीतील बैंगणवाडी, रफिक नगर, बाबा नगर, लोटस कॉलनी, गौतम नगर, मानखुर्दमधील मंडाला, जनता नगर, महाराष्ट्र नगर तसेच ट्रॉम्बेतील चिता कॅम्प परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून परिसरातील अमली पदार्थांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे युवासेनेकडून स्पष्ट करण्यात आले.