विराज स्टील प्रकल्पाच्या जनसुनावणीत समर्थन-विरोधाचा सूर
बोईसर / विभूती मेस्त्री
बोईसर : विराज स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासंदर्भातील जनसुनावणी बुधवारी (८ एप्रिल २०२६) संमिश्र वातावरणात पार पडली. सुनावणीदरम्यान विविध मुद्द्यांवर सखोल व सकारात्मक चर्चा झाली असून ग्रामस्थांनी समर्थन आणि विरोध अशा दोन्ही भूमिका मांडल्या.
काही ग्रामस्थांनी प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा ग्रामसभेत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच जनसुनावणीच्या ठिकाणाबाबत पर्यायी व्यवस्था करावी, असे मतही मांडण्यात आले. पर्यावरणीय मुद्द्यांवर भर देताना नदी व नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी कंपनीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.
दरम्यान, या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा सकारात्मक दृष्टिकोनही अनेकांनी व्यक्त केला.
साधारण, मान, वारंगडे, बारीपाडा, सुतारपाडा व गुंडले येथील सुमारे ३०० ते ४०० ग्रामस्थ सुनावणीस उपस्थित होते. काही आक्षेप नोंदवण्यात आले असले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही सुनावणी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले.
शेवटी, उपस्थितांचे आभार मानून अधिकाऱ्यांनी जनसुनावणी संपन्न झाल्याची घोषणा केली.