नवी मुंबईत शिंदे गटाच्या नगरसेवकावर महिलेकडून चपलेने हल्ला; व्हिडिओ व्हायरल, कारण अस्पष्ट

Spread the love

नवी मुंबईत शिंदे गटाच्या नगरसेवकावर महिलेकडून चपलेने हल्ला; व्हिडिओ व्हायरल, कारण अस्पष्ट

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक राम आशिष यादव यांच्यावर एका महिलेने चपलेने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यात संबंधित महिला यादव यांच्याकडे चप्पल फेकून मारताना दिसत आहे.

ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. व्हिडिओमध्ये उपस्थित नागरिक संबंधित महिलेला थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. घटनेदरम्यान मोठी गर्दी जमली होती. यावेळी काहींनी मोबाईलवर चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला.

या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, विरोधकांकडून शिंदे गटावर टीका करण्यात येत आहे. स्थानिक स्तरावरही या घटनेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, राम आशिष यादव हे यापूर्वीही वादग्रस्त ठरले आहेत. २०१९ मध्ये एका तरुणीने त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. तसेच, राबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात इतरही गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली होती. यापूर्वी त्यांना नवी मुंबईतून तडीपार करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

यादव यांचा राजकीय प्रवासही सतत बदलत राहिल्याचे दिसते. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपशी संबंधित होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

दरम्यान, या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, हल्ल्यामागील कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon