मुंबईत बँक मॅनेजर जोडप्याची कोट्यवधींची फसवणूक; विश्वास संपादन करून वृद्ध महिलेला ७६.५० लाखांचा गंडा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : दहिसर परिसरात एका बँक मॅनेजर जोडप्याने विश्वास संपादन करून धनाढ्य वृद्ध महिलेची तब्बल ७६.५० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली अधिक परताव्याचे आमिष दाखवत आरोपींनी ही रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपी जोडपे फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय मुकेश मेहता (बँक मॅनेजर) आणि त्याची पत्नी सुनीता मेहता यांनी सीमा शरीफ निजाम (वय वृद्ध) यांचा विश्वास संपादन करून ही फसवणूक केली. २०१८ साली बँकेच्या कामानिमित्त जय मेहताचा सीमांशी संपर्क आला होता. त्यानंतर त्याने पत्नी सुनीताची ‘शेअर मार्केट एक्सपर्ट’ अशी प्रतिमा निर्माण करून सीमांना अधिक परताव्याचे प्रलोभन दाखवले.
सुरुवातीला सीमांनी गुंतवणुकीस नकार दिला होता. मात्र, मेहताने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक व्यवहारात मदत करून विश्वास संपादन केला. विशेषत: सीमांच्या मुलाला परदेशात पैसे पाठवण्यास मदत केल्यानंतर त्यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला. याचाच फायदा घेत मेहताने सीमांचे मोबाईल आणि बँक खाते स्वतःच्या नियंत्रणात आणले.
यानंतर ‘सेल ऑप्शन’ गुंतवणुकीच्या नावाखाली मेहताने सीमांकडून ७६ लाख ५० हजार रुपये घेतले. या गुंतवणुकीवर १९ लाख रुपयांचा परतावा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ही संपूर्ण रक्कम मेहताने स्वतःच्या खात्यात वळवली. विश्वास टिकवण्यासाठी सीमांना केवळ ५ लाख रुपये रोख परत देण्यात आले, तर उर्वरित १४ लाखांचा परतावा देण्यात आला नाही.
यानंतर सीमांनी वारंवार पैशांची मागणी केल्यावर मेहताने टाळाटाळ सुरू केली. इतकेच नव्हे, तर तक्रारदार महिलेची बदनामी करण्याचाही प्रयत्न केला. हा प्रकार सीमांच्या मुलाच्या लक्षात आल्यानंतर त्याने मेहताला जाब विचारत पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मेहता जोडप्याने तक्रार न करण्याची विनंती केली.
दरम्यान, बँक स्टेटमेंटची तपासणी केल्यानंतर सर्व रक्कम जय मेहताच्या खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले. नोव्हेंबर २०२४ मध्ये आरोपींचे घर बंद आढळून आले असून तेव्हापासून मेहता जोडपे फरार आहे. या प्रकरणात आणखी चार जणांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
एमएचबी कॉलनी पोलिसांनी मेहता जोडप्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.