श्रीरामपूरमध्ये राम नवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक; मौलानांसह १२ जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

श्रीरामपूरमध्ये राम नवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक; मौलानांसह १२ जणांवर गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

अहिल्यानगर – जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे. गोंधवणी परिसरातून श्रीराम मंदिराच्या दिशेने निघालेल्या भव्य शोभायात्रेवर अचानक दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली. सय्यद बाबा चौकातील दर्गा परिसरात ही घटना घडली असून, यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सध्या श्रीरामपूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूरमधील गोंधवणी येथून रामनवमीनिमित्त पारंपरिक शोभायात्रा काढण्यात आली होती. ही मिरवणूक उत्साहात श्रीराम मंदिराकडे जात असताना सय्यद बाबा चौकातील दर्गा परिसरात पोहोचली. याच वेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने दगड येण्यास सुरुवात झाली. यामुळे मिरवणुकीत सहभागी असलेल्या भाविकांमध्ये मोठी धावपळ उडाली. या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सय्यद चौकातील काही स्थानिकांनी दावा केला आहे की, आधी मिरवणुकीतून दगडफेक करण्यात आली होती. या परस्परविरोधी दाव्यांमुळे तणाव अधिकच वाढला.

या घटनेप्रकरणी सुयोग झिरांगे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी मस्जिदमधील मौलाना आणि इतर १० ते १२ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः श्रीरामपूरमध्ये तळ ठोकून आहेत.

जिल्ह्यात एका बाजूला श्रीरामपूरमध्ये तणावाचे वातावरण असताना, दुसरीकडे अहिल्यानगर शहरात मात्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित रामनवमी मिरवणुकीत आमदार जगताप यांनी चक्क ‘अफजल खान वध’ आणि ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असे पोस्टर्स झळकवले. मिरवणूक कोतवाली पोलीस ठाण्याच्या चौकात येताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले आणि आमदारांनी भगवा पंचा फिरवत, दंड थोपटत जोरदार नृत्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon