एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; मुलुंड पोलीसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Spread the love

एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; मुलुंड पोलीसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईतील मुलुंड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका कॉलेजच्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर हल्ला केला. यावेळी बाजुलाच असलेल्या पीडितेच्या एका मित्राने कोयत्याचा वार स्वत:वर झेलत तरुणीला वाचवलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कॉलेजच्या आवारातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

आशिष गौतम बनसोडे असं अटक केलेल्या २१ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तर पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांच्या ओळखीचे असून दोघंही बदलापूर परिसरात वास्तव्याला आहेत. आरोपीचं पीडितेवर एकतर्फी प्रेम होतं. यातूनच तरुणाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी पीडित मुलगी ही मुलुंड येथे कॉलेजला आली होती. यावेळी आरोपीने पाठीमागून येऊन पीडित मुलीस पकडलं. तिच्या गळ्यात हात टाकून ‘तू माझ्याशी का बोलत नाहीस?’ असा जाब विचारला. तिला काही कळायच्या आत आरोपीनं धारदार कोयत्याने तिच्यावर वार केला. मात्र त्याच ठिकाणी असलेला पीडित मुलीचा मित्र मध्ये आला आणि आरोपीचा वार स्वत:च्या अंगावर झेलला. त्याच्या पाठीमागील बाजूस कोयत्याचा वार लागून तो जखमी झाला.

ही घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. काही विद्यार्थ्यांनी तातडीने विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या २४ तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला कोयता आरोपीकडून जप्त केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon