उरणमध्ये बनावट भूखंड विक्रीचा मोठा घोटाळा; ३६ जणांना तब्बल २.०७ कोटींचा गंडा

Spread the love

उरणमध्ये बनावट भूखंड विक्रीचा मोठा घोटाळा; ३६ जणांना तब्बल २.०७ कोटींचा गंडा

वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; जमीन दाखवून पैसे उकळल्याचा आरोप

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : उरण तालुक्यातील जुई परिसरातील बनावट भूखंड विक्रीच्या आमिषाने ३६ गुंतवणूकदारांची तब्बल २ कोटी ७ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित कंपनीच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील सर्वे क्रमांक ९८/३६ मधील जमीन विकसित होणार असल्याचे सांगत आरोपींनी गुंतवणुकीचे आमिष दाखवले. प्रति गुंठा लाखो रुपयांचा व्यवहार ठरवून विविध हप्त्यांमध्ये पैसे स्वीकारण्यात आले. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यक्षात जमीन हस्तांतरित करण्यात आली नाही किंवा ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यात आली नाही, असे तक्रारीत नमूद आहे.

पुढील चौकशीत संबंधित जमीन ही बनावट असल्याचे उघड झाले. भू-अभिलेख नोंदींमध्येही या सर्वे क्रमांकाचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणात एकाच पद्धतीने अनेकांना जाळ्यात ओढण्यात आले असून ३६ जणांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. वाशी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षकांकडे सोपवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, गुंतवणूक करताना जमीन व्यवहारांची शासकीय नोंदी तपासण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon