रमाबाई कॉलनीतील अंडागळे उद्यानात असामाजिकांचा अड्डा; नागरिकांची कारवाईची मागणी
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : घाटकोपर पूर्वेतील रमाबाई कॉलनीमधील अंडागळे उद्यानात अलीकडच्या काळात असामाजिक घटकांचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्यानात सायंकाळच्या सुमारास मद्यपान, गांजाचे सेवन तसेच महिलांची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या असून, या प्रकारांविरोधात तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मुंबई महानगरपालिकाच्या एन विभागांतर्गत येणारे हे उद्यान परिसरातील एकमेव मोकळे व विरंगुळ्याचे ठिकाण मानले जाते. सकाळ-संध्याकाळ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला येथे फेरफटका मारण्यासाठी येतात. मात्र, वाढत्या गैरप्रकारांमुळे सामान्य नागरिकांना उद्यानात जाणेही कठीण झाले असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.
स्थानिक समाजसेवक लक्ष्मण जाधव (उर्फ बाळू जाधव) यांनी सांगितले की, “सायंकाळी काही जण येथे मद्यपान करतात, तर काहीजण गांजाचे सेवन करून परिसरात दहशत निर्माण करतात. महिलांची छेडछाडही केली जाते.” याबाबत पंतनगर पोलीस ठाणे येथे अनेकदा लेखी तक्रारी देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, कुमारी पूजा अंडागळे या दिव्यांग तरुणीनेही या प्रकारांविरोधात तक्रार दिली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही टोळक्यांकडून नियमितपणे उद्यानात दहशत माजवली जात असून, यामध्ये तथाकथित ‘अहिरे गँग’चा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संदर्भात नागरिकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त यांना ई-मेलद्वारे तक्रारी पाठवून कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत विचारणा केली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी “प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल,” असे सांगितले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करून उद्यान असामाजिक घटकांच्या विळख्यातून मुक्त करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.