आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटवर घाव; लखनऊतून दोन आरोपी अटकेत

Spread the love

आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटवर घाव; लखनऊतून दोन आरोपी अटकेत

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई/लखनऊ : महाराष्ट्रातील निवासी भागांतील पब, हॉटेल आणि खासगी पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीविरोधात मोठी कारवाई करत उत्तर प्रदेश एसटीएफ ने दोन वाँटेड आरोपींना लखनऊ येथून अटक केली. नायगाव पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा क्रमांक १३५/२०२६ (एनडीपीएस कायदा कलम ८(सी), २१(बी), २९) प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भावेश चौहान उर्फ लालू (रा. नालासोपारा पूर्व) आणि शोएब अशरफ पठाण उर्फ बटला (रा. नालासोपारा पूर्व) यांचा समावेश आहे. दोघांना २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता चारबाग रेल्वे स्टेशन परिसरातील टेम्पो स्टँडजवळ सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईसाठी नायगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने लखनऊ येथील एसटीएफ कार्यालयाशी समन्वय साधून आरोपींच्या हालचालींबाबत माहिती दिली होती. त्यानंतर एसटीएफ मुख्यालयाने तातडीने पथकाला कारवाईचे निर्देश दिले.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी गेल्या चार ते पाच वर्षांपासून आंतरराज्यीय पातळीवर अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची कबुली दिली. बाजारात सहज उपलब्ध केमिकल्सचा वापर करून ‘ब्राऊन शुगर’ तयार करून ती विविध ठिकाणी पुरवठा केल्याचेही त्यांनी मान्य केले.

तसेच, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी वसई-विरार परिसरात ड्रग्जचा मोठा साठा जप्त झाल्यानंतर हे दोघे मुंबईतून फरार झाले होते. लखनऊमार्गे नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अटक करण्यात आली.

सदर प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून त्यांना लवकरच महाराष्ट्रात आणून तपास पुढे नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon