निवडणूक जाहीर झाल्यांनतर पहिल्याच दिवशी आचारसंहितेचा भंग ? महापालिका मुख्यालयात रात्रभर प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच सोमवारी दुपारी ४ वाजता आचारसंहिता लागू झाली. मात्र, असे असतानाही पालिकेच्या सचिव कार्यालयात पहिल्याच दिवशी आचारसंहितेचा भंग झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. सचिव कार्यालयात प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेसाठी सोमवारी रात्रभर लगबग सुरू होती. हे काम दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ च्या सुमारास थांबविण्यात आल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होत असून निवडणुकीसाठी सोमवार, १५ डिसेंबर रोजी आचारसंहिता लागू झाली. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची असते. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित असते.
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कुठेही तिचा भंग होऊ न देण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. मात्र, प्रशासन दरबारीच नियमांची पायमल्ली झाल्याने निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता, पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आचारसंहिता लागू झाल्यांनतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळपर्यंत प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेचे काम सुरू होते.
या प्रकरणी समाजसेवक अनिल म्हस्के यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. प्रतिबंधित कालावधीत प्रस्तावांची प्रक्रिया सुरू होती. संबंधित प्रस्तावांशी निगडित महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तसेच कंत्राटदार मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित होते, असा आरोप त्यांनी केला आहे.