नाताळ–नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोव्यातील मद्याचे १,५५० बॉक्स जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : नाताळ आणि नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून होणाऱ्या बेकायदा मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे यांनी गोवा राज्यात निर्मित भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडून तब्बल १,५५० बॉक्स मद्य जप्त केले. या कारवाईत सुमारे १ कोटी ८२ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे.
दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीनुसार महापे ते ठाणे रोड परिसरात गस्त सुरू असताना सुमारे सकाळी ९.४० वाजता अशोक लेलँड कंपनीचा सफेद रंगाचा सहाचाकी टेम्पो (क्रमांक KA-09-AB-1087) संशयास्पदरीत्या आढळून आला. वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मद्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले.
या प्रकरणी दारूबंदी गुन्हा रजिस्टर क्र. २७१/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पोसह मद्यसाठा जप्त करण्यात आला असून आरोपी भागीरथराम हिराराम गोदारा (वाहनचालक) याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक प्रविण तांबे आणि उपअधीक्षक ए. डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक एम. पी. धनशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे करीत आहे.
नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य वाहतुकीवर कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.