धाराशिवमधील कला केंद्रातील नर्तिकेच्या नादातून युवकाचं टोकाचं पाऊल; प्रेमसंबंधातून वाद झाल्याने तरुणाची गळफास घेत आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
धाराशिव – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि बीड जिल्ह्यातील गेवराई येथे नर्तिकेच्या नादातून युवकाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर, आता धाराशिवमध्ये कला केंद्रातील महिलेसोबत प्रेमसंबंधातून वाद झाल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अश्रुबा कांबळे असं मृत युवकाचं नाव असून दोघेही एकत्रितपणे देवदर्शनासाठी गेले होते, तिथून आल्यानंतरच किरकोळ वाद दोघांमध्ये झाला. त्यातूनच, तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. दरम्यान, यापूर्वी वैरागच्या सासुरे येथेही बीडमधील एका युवकाने नर्तिकेच्या नादात स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती.
धाराशिवमधील साई कला केंद्रमध्ये नृत्य काम करणाऱ्या महिलेचा तिच्या प्रियकरासोबत वाद झाला. त्यामध्ये, प्रियकराने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, धक्कादायक बाब म्हणजे या धमकीनंतर काही वेळातच प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्रुबा अंकुश कांबळे (२५) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अश्रुबा कांबळे रुई ढोकी गावचा रहिवाशी आहे, गेल्या ५ वर्षापासून कला केंद्रातील नर्तिका आणि त्याच्यात अनैतिक प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली असून मृत तरुण आणि तरुणी शिखर शिंगणापूर येथे काल देवदर्शनाला गेले, देवदर्शन करून परतत असताना दोघांमध्ये वाद झाला.
देव दर्शनावरुन परत येत असताना मृत प्रियकराच्या बायकोचा फोन आला म्हणून नर्तिका आणि अश्रुबा यांच्या वाद झाला होता. त्यानंतर, मी आत्महत्या करतो म्हणून धमकी देत तो निघून गेला. मात्र, प्रियसीने अश्रुबाच्या या धमकीडे दुर्लक्ष करत गांभीर्याने विचार केला नाही. तर, अश्रुबाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीस आले. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पोस्टमार्टम करून त्यांनी मृत व्यक्तीचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी, येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, मात्र या घटनेने धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिलेने त्रास दिला का याचाही तपास पोलीस करत आहेत.