मालेगाव तालुक्यात ३ वर्षांच्या निष्पाप मुलीवर अमानुष अत्याचार करून निर्दयीपणे हत्या;आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत नातेवाईकांचा रास्ता रोको
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात संतापजनक घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका ३ वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाकडून अत्याचार करत तिचा निर्घुण खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं मृत चिमुकलीच्या नातेवाईक आणि मालेगावकरांच्या मनात तीव्र संतापाची लाट उठली आहे. आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना घडली असून प्राथमिक माहितीच्या आधारे एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली होती. मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडत आरोपीला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अत्याचार करून निर्घृण खून केलेल्या चिमुरडीचा मृतदेह हा मालेगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून विजय खैरनार नामक संशयित आरोपीला अटक केली आहे.
सोमवारी सकाळी मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं. त्यानंतर मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर केस ही फास्टट्रॅक कोर्टात नेऊन, सरकारी वकील उज्वल निकम यांना ही केस लढवण्याकरिता नेमलं जाईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं.
दरम्यान, ‘आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत ज्या काही कायदेशीर बाबी करता येतील त्या आम्ही लवकरात लवकर करु. सदर घटना ही रेप विथ मर्डरची घटना झाली असून याबाबत गुन्हा देखील दाखल झाला आहे. तर याचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकारी कडून करण्यात येत आहे. गंभीर घटनेचा विचार करता पुरावे जमा करण्यास अडचण निर्माण होणार नाही असं काम आम्ही करीत असून, ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालेल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. लोकांच्या भावना तीव्र आहेत, आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत ज्या काही कायदेशीर बाबी करता येतील त्या पूर्ण आम्ही लवकरात लवकर करु’, असं नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.