जी-२० परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाला ब्लॅकमेल; तरुणीविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील एका प्रथितयश वकिलाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तब्बल दीड कोटी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित वकील हा केंद्र सरकारसाठी उच्च पदावर कार्यरत असून, त्याने जी-२० परिषदेसह अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
या हायप्रोफाईल प्रकरणात गोरेगाव पोलीस ठाण्यात संबंधित तरुणीविरोधात ब्लॅकमेलिंग, फसवणूक आणि धमकी यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
प्राथमिक माहितीनुसार, वकील आणि संबंधित तरुणीची ओळख मित्रांच्या माध्यमातून झाली होती. काही काळानंतर इन्स्टाग्राम आणि मोबाईलद्वारे दोघांमध्ये संवाद सुरू झाला. या ओळखीचे रूपांतर पुढे भेटींमध्ये झाले. त्यानंतर तरुणीने विविध कारणे सांगून वकिलाकडून वेळोवेळी पैसे मागितले, जे त्याने विश्वासावरून दिले.
सुरुवातीला २० ते ३० लाखांच्या व्यवहारानंतर, वकिलाने पैसे परत मागितल्यावर तरुणीने मॉर्फ केलेले फोटो दाखवत धमकावले की, हे फोटो व्हायरल केले जातील आणि त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाईल. या भीतीतून वकिलाकडून एकूण दीड कोटी रुपये उकळण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
वकिलाने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये तिच्या कुटुंबीयांचा सहभाग असल्याचीही शक्यता पोलिस तपासत आहेत.
या प्रकरणामुळे कायदेविषयक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ वकिलाला अशा प्रकारे ब्लॅकमेल केल्याने या तरुणीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.