पोलिस उपनिरीक्षकावर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीचा गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या महिलेचे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यानंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका पोलिस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी फुरसूंगी पोलिस ठाण्यात ३४ वर्षीय महिलेनं तक्रार दाखल केली आहे.
गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव अजिंक्य रायसिंग जाधव (वय ३२, रा. पिंपरी-चिंचवड) असे असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जाधव आणि पीडित महिलेची २०२३ मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर जाधवने कपटपूर्वक विवाहाचे वचन दिले व विविध ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, पुढे लग्न करण्यास नकार देत तिला शिवीगाळ, मारहाण तसेच “तुला जे करायचं ते कर, मला कोणी काही करू शकत नाही” अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फुरसूंगी पोलीस करीत आहेत.