शॉर्ट सर्किटमुळं मुंबईत इमारतीला भीषण आग ! गुदमरून ८० वर्षीय महिलेचा मृत्यू, ५-६ जण गंभीर

Spread the love

शॉर्ट सर्किटमुळं मुंबईत इमारतीला भीषण आग ! गुदमरून ८० वर्षीय महिलेचा मृत्यू, ५-६ जण गंभीर

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – दहिसर पूर्व परिसरातील शांतीनगर भागात असलेल्या न्यू जन कल्याण इमारतीत रविवारी दुपारी मोठी आग लागल्याची घटना घडली. दुपारी साधारणपणे ३ वाजण्याच्या सुमारास सातव्या मजल्यावर अचानक ही आग लागली. गुदमरल्यामुळे ५-६ जण गंभीर जखमी झाले असून, एका ८० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दहिसरमधील शांती नगर येथील न्यू जनकल्याण सोसायटीमधील २३ मजली निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर रविवारी दुपारी आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी ३.०५ च्या सुमारास आगीची माहिती मिळाली, त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) सात अग्निशमन गाड्या सहाय्यक वाहनांसह घटनास्थळी पाठवल्या, असे एका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात धूर संपूर्ण इमारतीत पसरला. धुरामुळे इमारतीत अडकून राहिलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवळपास ७ ते ८ बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, इमारतीत पसरलेल्या दाट धुरामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. तरीही अग्निशमन दलाने वेळीच कारवाई करून रहिवाशांना बाहेर काढले.

रविवार असल्याने इमारतीत बहुतांश लोक घरी होते. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. धूर पसरल्याने श्वसनास त्रास होऊन काही रहिवासी अडकून पडले. त्यांना तत्काळ बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पोलिसांनी एडीआर नोंदवला असून आगीचे नेमके कारण आणि जबाबदार कोण याचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून, नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon