कोंबड्या हातात घेऊन खाटीक समाजाचा महापालिकेसमोर ठिय्या; चिकन-मटण विक्री बंदीवरून तणाव
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी महापालिका हद्दीत २४ तास सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बंदीमुळे चिकन व मटण विक्री ठप्प होणार असल्याने खाटीक समाज व विक्रेते संघटना संतप्त झाल्या आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी आंदोलकांनी हातात जिवंत कोंबड्या घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर ठिय्या मांडला. महापालिका प्रशासनाने १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय १९ डिसेंबर १९८८ रोजीच्या प्रशासकीय ठरावावर आधारित असून, बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांच्या मान्यतेनंतर सर्व कत्तलखाने चालकांना लेखी नोटीस देण्यात आली आहे. आदेशानुसार, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आणि मोठ्या जनावरांची कत्तल या कालावधीत पूर्णपणे बंद राहील.
महापालिकेच्या या निर्णयाला खाटीक संघटनांसह काही राजकीय मंडळींनी तीव्र विरोध दर्शवला. आंदोलकांनी इशारा दिला की, निर्णय मागे घेतला नाही तर स्वातंत्र्य दिनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल. यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून महापालिका कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तसेच महापालिका परिसरापासून १०० मीटर अंतरावर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र बंदी मागे घेण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिल्याने संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.