दिवा- मुंब्रा लोकल दुर्घटनेत जीआरपी कर्मचाऱ्याचा मृत्यू; घटनेनंतर सर्वत्र खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला आहे. लोकलमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काही गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडणीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एका जीआरपी कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी हे दारात लटकत होते. लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले. त्यामुळे दारत असलेले प्रवासी खाली कोसळले आणि आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जीआरपी कर्मचारी विकी बाळासाहेब मुख्यादल यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.
मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान झालेल्या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत असतील. तसेच २३८ एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. या सर्व गाड्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत. आयसीएफद्वारे एक्झिस्टिंग लोकलला रेट्रो फिकमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावणार आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल भाष्य केले आहे. दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.