ठाण्यात बहुमजली इमारतीत लिफ्टमध्ये बिघाड झाल्यामुळे रहिवासी तब्बल आर्धातास अडकले
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील बहुमजली इमारतीत लिफ्टमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली. यामध्ये पाच रहिवासी तब्बल अर्धा तास लिफ्टमध्ये अडकून पडले होते.गुरुवारी रात्री बाळकूम परिसरात हा प्रकार घडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या पाचही व्यक्तींची सुखरूप सुटका केली आहे. यात दोन वर्षांची चिमुकलीही पालकांसमवेत लिफ्टमध्ये अडकली होती. तिलाही सुखरूप बचाव पथकाने बाहेर काढले. वैकुंठ पिरॅमिल सोसायटीच्या वैराट इमारतीमध्ये ही घटना घडली. बंद लिफ्टमध्ये रहिवासी अर्धा तास अडकून पडले होते, याबाबत बाळकूम अग्निशमन केंद्राला कळवले. अग्निशमन दलाच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि इमारतीचा तिसरा मजला गाठला. बाळकूम अग्निशमन केंद्राचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी मनोज लोणे यांच्या पथकाने याठिकाणी यंत्राने लिफ्टचा दरवाजा उघडून या पाचही रहिवाशांना अवघ्या काही मिनिटांत बाहेर काढले.