बांद्रा येथील ड्रग माफिया नीलोफर व रुबीना अजूनही मोकाट, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लावण्यास टाळाटाळ
दरगाह गल्ली व म्हाडा ग्राउंड परिसरात दिवसरात्र एमडी ड्रग्जचा व्यापार तेजीत
पोलीस प्रशासनाच्या डोळ्यावर गांधारीरुपी पट्टी
मुंबई -पोलिसांनी डोंगरीच्या ‘ड्रग किंग’ फैसल जावेद शेखवर मोक्का लावून त्याची चेन्नई कारागृहात रवानगी करण्यात आली. पण बांद्रा पश्चिम मधील कुख्यात ड्रग माफिया नीलोफर आणि रुबीना यांच्यावर अजूनही कठोर कारवाई का झाली नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. बांद्रा पश्चिम दरगाह गल्ली आणि म्हाडा ग्राउंड परिसरात दिवसरात्र एमडी ड्रग्ज खुलेआम विकले जात आहेत. अनेक अल्पवयीन आणि तरुण मुलांकडून फक्त २००० रुपयांत हे काम करवून घेतले जाते. ही मुलं १००० ते १०,००० आहेत रुपयांपर्यंतचे एकेक ड्रग्जचे पॅकेट विकतात. दररोज किमान पन्नास लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज येथे विकले जातात. नीलोफर आणि रुबीना यांच्याविरुद्ध अँटी नार्कोटिक सेल आणि नार्कोटिक कंट्रोल ब्युरो, मुंबईमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. ठाणे अँटी नार्कोटिक सेलच्या केसमध्ये नीलोफर वॉन्टेड आहे, तरीही आजवर तिची अटक झाली नाही.
रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत अनेक कॉलेज तरुणी आणि युवक इथे ड्रग्ज घेण्यासाठी येतात. दिवसा पोलिस शोध मोहीम चालवतात, पण पोलिसांची गाडी दिसताच सर्वजण पसार होतात. गेल्या एका महिन्यात बांद्रा पोलिस आणि अँटी नार्कोटिक सेलने ब्राउन शुगर आणि गांजाचे १० हून अधिक छोटे ड्रग पेडलर्स पकडले, पण एमडी ड्रग्जच्या मोठ्या पुरवठादार नीलोफर आणि रुबीना अजूनही पोलिसांच्या हाती लागलेल्या नाहीत.
मुंबई पोलिसांनी अलीकडेच अनेक ड्रग वर्कर्सना १० ग्रॅम एमडीसह अटक केली असून चौकशीतून माफियापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही नीलोफर आणि रुबीना या मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटच्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई का होत नाही?
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिस ‘ड्रग्स फ्री मुंबई’ मोहिम राबवत आहेत, पण जोपर्यंत अशा मोठ्या ड्रग्ज डीलर्सना अटक केली जात नाही, तोपर्यंत तरुण पिढीला नशेच्या गर्तेतून वाचवता येणार नाही. नीलोफर आणि रुबीना यांना लवकरात लवकर अटक झाली, तर अनेक कॉलेज विद्यार्थ्यांचे जीवन बिघडण्यापासून वाचू शकते.