कल्याणमध्ये उल्हास नदीने भलामोठा हायवा ट्रक गिळला, ड्रायव्हर अन् क्लिनर आतमध्येच, फायर ब्रिगेडकडून शोध सुरु

Spread the love

कल्याणमध्ये उल्हास नदीने भलामोठा हायवा ट्रक गिळला, ड्रायव्हर अन् क्लिनर आतमध्येच, फायर ब्रिगेडकडून शोध सुरु

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – कल्याणच्या गांधारी पुलावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या हायवा ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रक पुलाचे कठडे तोडत थेट उल्हास नदीत कोसळला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. नदीत कोसळलेल्या ट्रकचा चालक आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक व्यक्ती सध्या बेपत्ता आहे. त्यांच्या शोधासाठी अग्निशामक दलाची शोधमोहीम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास कल्याण पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान, बापगाव येथून निलेश वानखेडे हे आपल्या आईला रिक्षातून कल्याणला घेऊन येत होते. त्या दरम्यान गांधारी पुलावर त्यांच्या रिक्षाला हायवा ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात निलेश यांच्या आई मंगल वानखेडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर निलेश वानखेडे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

हायवा ट्रकने रिक्षाला धडक दिल्यानंतर तो गांधारी पुलाचा कठडा तोडत थेट उल्हास नदीत कोसळला. नदीत कोसळल्यानंतर हायवा ट्रकचा चालक आणि त्याच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती बेपत्ता झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हायवा ट्रकमध्ये ड्रायव्हर अन् क्लिनर अडकल्याची शक्यता असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली आहे. अग्निशामक दल, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने नदीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon