गडहिंग्लजमध्ये पत्नीने केली पतीची गळाचिरून हत्या, आरोपी पत्नीला पोलिसांनी केली अटक
पोलीस महानगर नेटवर्क
गडहिंग्लज – पत्नी घरात भांडी घासत असताना दारू पिऊन आलेल्या पतीने प्लास्टिक पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या झटापटीत हातात सापडलेल्या चाकूने पत्नीनेच पती रमेश रावसाहेब मोरे (वय ४०) याच्या गळ्यावर मधोमध वार केला व
वार वर्मी लागल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. सदर घटना लिंगनूर कसबा नूलमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रणिता रमेश मोरे (३५) हिला ताब्यात घेतले आहे. गडहिंग्लज पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे कुटुंबीयांचे कौलारू घर गावातील चावडी गल्लीत आहे. तो, पत्नी व मुलगा या घरात राहतात. रमेश गवंडीकाम करायचा. घरची परिस्थिती बेताचीच आहे. रमेश व्यसनी होता. तो, दारू पिऊन दररोज पत्नीशी भांडायचा. त्याला प्रणिता वैतागली होती.
तो गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. जेवला व झोपी गेला. दुपारी दोनच्या सुमारास झोपेतून उठलेल्या रमेश पत्नीला शिवीगाळ करू लागला. त्यावेळी त्याने प्रणिताला प्लास्टिक पाईपने मारहाण केली. त्यानंतर दोघांमध्ये झटापट सुरू झाली. त्याचवेळी हातात सापडलेल्या चाकूने प्रणिताने रमेशच्या गळ्यावर मध्यभागी वार केला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रमेशला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात हलविले; परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक रामदास इंगवले यांनी भेट दिली आहे. प्रणिताने झटापटीवेळी पतीला चाकू लागल्याचे सांगितले असले तरी या घटनेमागची नेमकी वस्तुस्थिती तपासण्यासाठी फोन रेकॉर्ड, शवविच्छेदन अहवाल आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केल्याचे सिंदकर यांनी सांगितले. दरम्यान, रमेश याचा भाऊ उमेश मोरे याने या संदर्भात फिर्याद दिली आहे.
रक्ताचे फवारे भिंतीवर
घरातील तिसऱ्या खोलीत स्वयंपाकघरात हा प्रकार घडला. प्रणिताने रमेशच्या गळ्यावर मधोमध चाकूने केलेला वार इतका वर्मी होता की शेजारच्या भिंतीवर रक्ताचे फवारे उडाले होते. रक्ताच्या थारोळ्यातच रमेश पडला होता. त्याचा चेहरा, डोके व निम्मे शरीर रक्ताने माखले होते. घटनास्थळावरील रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसत होते. रमेशच्या चुलत भावाला या भांडणाची माहिती मिळाली. त्यानंतर घरात भांडण सुरू असून तू लवकर ये, असे त्याने रमेशचा मुलगा केदारला दूरध्वनी करून सांगितले. केदार आल्यानंतर चुलत भाऊ आणि गावातील एकजण घटनास्थळी गेले. त्यावेळी घरी प्रणिता एकटीच बसलेली आणि रमेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
उशिरपर्यंत सुगावाच नाही…
दरम्यान, मोरे दांपत्याला मुलगा व मुलगी आहे. मुलगा केदार आज यात्रेसाठी करंबळीला गेला होता. मुलीचा विवाह झाला आहे. रमेशची आई लहान भावाकडे कागलला असते. दरम्यान रमेश दारूच्या नशेत नेहमी पत्नीशी भांडत असे. गुरुवारीही त्यांचे भांडण सुरू झाले. आवाजामुळे भांडण गल्लीतील शेजारी व नातेवाइकांना ऐकू येत होते. काही वेळानंतर प्रणिताच्या हातून चाकूचा वार रमेशच्या गळ्यावर बसल्यानंतर अचानक शांतता पसरली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.