कल्याणमधील क्रीश व के.के. वाईन शॉपवर कारवाई करण्याची मागणी
काऊंटरवर मद्य प्राशन व शासकीय नियमांची पायमल्ली
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याणमधील खडकपाडा येथील साईचौक परिसरात असलेले क्रीश वाईन शॉप हे अनेकवेळा रात्री उशिरापर्यंत चालू असते. शासनाचे सर्व नियम, निकष तोडून, मोडून क्रीश वाईन शॉप सुरू असते. या वाईन शॉप च्या दर्शनी भागात कोणताही सुचना फलक लावलेला दिसत नाही, कोवळ्या मुलांनाही येथे मद्यविक्री केली जाते, त्यासाठी कोणताही परवाना विचारला जात नाही, कोणताही ड्रेसकोड नाही. आश्चर्य म्हणजे क्रीश वाईन शॉप च्या काऊंटरवरून मद्य विकत घेतल्यावर ग्राहक तिथेच मद्यप्राशन करताना दिसून येतात. तसेच कल्याण स्टेशन परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाजूला असलेल्या के.के. वाईन शॉपच्या बोर्डवर साधा अनुज्ञाप्ती नंबर देखील लिहिलेला न्हवता, आमच्या दैनिक पोलीस महानगरच्या प्रतिनिधीने विचारल्यावर अर्ध्या तासात घाईघाईने नंबर टाकण्यात आला. के.के. वाईन शॉपची देखील क्रीश वाईन शॉप प्रमाणे स्थिती आहे. बोर्ड नसणे, ड्रेसकोड पत्ता नाही अशा अनेक नियमांची पायमल्ली करून आपली दुकाने थाटली आहेत.
कायदा बासनात गुंडाळून वाईन शॉप चालू?
परवाना नसताना मद्य बाळगणे तसेच परवाना नसलेल्यांना मद्यविक्री करणे हा गुन्हा आहे. ग्राहकाकडे परवाना आहे की नाही, हे पाहण्याची आणि त्यासाठी योग्य ती सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर टाकलेली आहे. या नियमांचे कोणीही मद्यविक्रेता पालन करत नाही. एकाही मद्य विक्री दुकानात मद्य सेवन परवाना विचारला जात नाही
दृष्टीहीन स्थानिक राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक
महाराष्ट्र शासनाची मद्य विक्री करण्यासाठी कडक नियमावली आहे. सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत वेळेचे बंधन घालून दिलेले आहे. मात्र, कल्याणमधील अनेक वाईन शॉप रात्री उशिरापर्यंत चालू ठेऊन मद्य विक्री करतात हा सर्व गैरप्रकार दैनिक ‘पोलीस महानगर’ च्या प्रतिनिधीने आपल्या कॅमेरात कैद केला आहे तसेच सदर वाईन शॉपची अनुज्ञाप्ती रद्द करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी व ठाणे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रवीण तांबे यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.