पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई अलर्टवर, सीएसटीएम रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवली

Spread the love

पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई अलर्टवर, सीएसटीएम रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवली

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात देशाच्या २८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचा लाट पसरली आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांनी यावेळी पर्यटकांनाच लक्ष्य केलं. त्यामुळे जगभरात या घटनेवर संताप व्यक्त केला जातोय. या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांचादेखील मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी घातलं जातं. त्यामुळे भारताने पाकिस्तानवर निर्बंध घातले आहेत. तसेच भारताने भारत-पाक सीमेवरील सिंधू करार देखील रद्द केला आहे. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांसाठीचा विझा रद्द केला आहे. या हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तिथले चेक-पोस्ट बंद करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताला धमकी दिली जात आहे. तिथल्या मंत्र्यांकडून प्रक्षोभक वक्तव्ये केली जात आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवाद हल्ल्याच्या घटनांचा इतिहास पाहिला तर मुंबईचं या हल्ल्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. मुंबईत एकेकाळी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. तसेच त्यानंतर २६/११चा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या जखमा कधीही भरुन निघणार नाहीत, अशा आहेत. पहलगाम येथील हल्ल्यानंतर अतिरेक्यांकडून पुन्हा मुंबईवर लक्ष्य केलं जाऊ शकतं. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे कोट्यवधी नागरीक राहतात. याआधीच्या हल्ल्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर (सीएसएमटी) येऊन दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यामुळे अशा घटनेची पुनरावृत्ती घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत.

पहलगाम येथील हल्ल्यानंतर आता मुंबईतदेखील अलर्ट जारी करण्यात आलं आहे. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि आरपीएफ यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे. खबरदारी म्हणून सीएसएमटी स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ, डॉग स्क्वॉडकडून संयुक्त गस्तीला सुरुवात झाली आहे. तसेच सीएसएमटी स्थानकाच्या सुरक्षेची आज संध्याकाळी सात वाजता पाहणी केली जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईत पोलीस हाय अलर्टवर आहेत. तसेच सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जात आहे. एनआयएकडून तपासाला वेग आल्याची माहिती आहे. एनआयएने घटनास्थळावरुन गोळा केलेले नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. एनआयडीकडून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचेदेखील जबाब नोंदवणं सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon