ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता?

Spread the love

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता?

महायुती सरकारकडून अनिल परब यांच्याभोवती फास आवळण्याच्या हालचाली सुरू

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारकडून अनिल परब यांच्याभोवती फास आवळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. सेवानिवृत्तीनंतरही परिवहन विभागाशी संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप खरमाटे यांच्यावर आहे. या प्रकरणात आता त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

सेवानिवृत्तीनंतरही परिवहन विभागाशी संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप खरमाटे यांच्यावर आहे. मागच्या तीन महिन्यांत हॉटेल्समध्ये परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेऊन विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा त्यांचावर आरोप आहे. याबाबत आता मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरमाटे आणि अनिल परब यांच्या आर्थिक संबंधांची चौकशी विविध तपास यंत्रणेकडून सुरु आहे. त्यातच आता आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीची देखील भर पडली आहे.

ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरमाटे यांची चौकशी केली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांच्या नागपूर येथील घरी छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर त्यांना समन्स बजावून मुंबईत चौकशीसाठी बोलावण्यात आले, जिथे ८ तासांहून अधिक काळ त्यांची कसून चौकशी झाली. त्यांच्या मोबाइलचीही तपासणी करण्यात आली होती. अनिल देशमुख प्रकरणातही खरमाटे यांचं नाव समोर आलं होतं. आयकर विभागाने खरमाटे यांच्या संपत्तीवर छापे टाकले असून, त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत असलेली प्रचंड संपत्ती उघड झाली आहे. यातून त्यांच्यावर बेनामी मालमत्तांचा संशय वाढला.नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी खरमाटे यांच्या भ्रष्टाचाराची खुली चौकशी करण्याची शिफारस केली होती. राज्य सरकारने लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon