पाच वर्षीय चिमुरडीला बेदम मारहाण; अमानुष छळ करणाऱ्या महिलेला पोलीसांनी केली अटक

Spread the love

पाच वर्षीय चिमुरडीला बेदम मारहाण; अमानुष छळ करणाऱ्या महिलेला पोलीसांनी केली अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

मिरारोड – मीरारोड येथे एका पाच वर्षीय मुलीला बेदम मारहाण करून चटके दिल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मुलीचा सांभाळ करणाऱ्या महिलेने आणि तिच्या अल्पवयीन मुलाने मिळून या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलीच्या आईच्या तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, गंभीर अवस्थेतील मुलीवर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पीडित मुलीची आई मुंबईतील अंधेरी परिसरात राहते. कामानिमित्त ती मुलीची देखभाल करू शकत नव्हती, त्यामुळे तिने वैशाली डेढीया या आरोपी महिलेकडे मुलीला सांभाळण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र, विश्वासघात करत या महिलेनं तिच्या मुलासोबत मिळून मुलीला अमानुष छळले. मंगळवारी रात्री, वैषाली डेढीयाच्या अल्पवयीन मुलाने पीडित मुलीला बेदम मारहाण केली. रागाच्या भरात तिला उचलून बेडवर आणि जमिनीवर आपटले. या मारहाणीत मुलीच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर मुलगी वेदनांनी कळवळत असताना ती बेशुद्ध झाली. मात्र, वैशालीला वाटले की ही मुलगी नाटक करत आहे. त्यामुळे तिने अजूनही थांब न घेता तिला क्रूर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.वैशालीने आपल्या मुलाला गॅसवर उलथणे गरम करण्यास सांगितले. त्यानंतर स्वतःच्या हाताने ती चटके गालावर, छातीवर, पोटावर, दोन्ही मांड्यांवर, डाव्या गुडघ्यावर आणि पाठीवर दिले. या भयंकर छळामुळे मुलीच्या शरीरावर ठिकठिकाणी भाजल्याच्या खोल जखमा झाल्या आहेत.

मुलगी गंभीर जखमी झाल्यानंतर तिला भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने तिला तातडीने मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. तिच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मुलीच्या आईला जेव्हा या अमानुष अत्याचारांची माहिती मिळाली, तेव्हा तिने तात्काळ नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी वैशाली अजय डेढीया आणि तिच्या १७ वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. नयानगर पोलीसांनी या महिलेला अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीवर बालगुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon