पुण्यात पोलिसाच्या १९ वर्षीय मुलाचं टोकाचं पाऊल; राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुण्यात पोलिसाच्या मुलाने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. राहत्या घरी त्याने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेनंं परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर येथील पोलिस वसाहतीत एका १९ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमभंग झाल्याच्या कारणास्तव या तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. प्रकरणातील मृत तरूणाचं नाव ऋषिकेश दादा कोकणे – १९ आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश कुटुंबासह शिवाजीनगर पोलिस वसाहतीतील ई ब्लॉक इमारतीत राहत होता. त्याचे वडील दादा कोकणे राज्य राखीव पोलिस दलात (दौंड) सहाय्यक उपनिरीक्षकपदी नेमणुकीस आहेत. तर, ऋषिकेश हा कला शाखेच्या पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्याचे आई-वडील शनिवारी बाहेर गेले होते. त्यावेळी त्याचे मित्र त्याला फोन करत होते. मात्र, ऋषिकेश कडून उत्तर न मिळाल्याने मित्र घरी आले. त्यांनी घराचा दरवाजा वाजवला असता, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी पोलिसांना संबंधित माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ऋषिकेश याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ देखील बनवला असून त्यामध्ये त्याने प्रेमभंगातून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाजीनगर प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करीत आहेत.