नंदुरबारमध्ये हत्येचा थरार!
चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद; लग्नाला निघालेल्या तरुणावर हल्ला, दोघेजण जख्मी तर एकाचा मृत्यू
योगेश पांडे/वार्ताहर
नंदुरबार – बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर एक प्रवासी जखमी झाला आहे. चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जागेवरून झालेल्या वादानंतर टोळक्याने नंदुरबार रेल्वे स्टेशनवर केलेल्या हल्ल्यात दोन राजस्थानी प्रवासी जखमी झाले होते. यातील २७ वर्षांच्या सुमेरसिंग जबरसिंग याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मयत सुमेरसिंग आणि त्याच्या बहिणीचे २० तारखेला लग्न असल्याने तो भावांसोबत चेन्नईहून जोधपूरला जात होता. मात्र लग्नाच्याआधीच सुमेरसिंग याचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. जोपर्यंत आरोपींना जेरबंद केलं जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा सुमेरसिंग याच्या नातेवाईकांनी घेतला आहे. दुसरीकडे हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करण्यासाठी करणी सेनाही आक्रमक झाली आहे.
नंदुरबार रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या अवैध आणि गोरखधंदा पाठीशी घालण्यासाठी रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही लावले जात नाहीत का? असा सवाल मंत्री जयकुमार रावल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना विचारला आहे. रेल्वे दुर्घटनेतील नातेवाईकांनी नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली, त्यानंतर जयकुमार रावल यांनी सीसीटीव्हीबाबत लोहमार्ग पोलीसच्या पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांना विचारणा केली. रेल्वे प्रशासनाकडून आदिवासी बहुल भाग असलेल्या नंदुरबार, दोंडाईचा, अंमळनेर, नवापूर या रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जयकुमार रावल यांनी केला आहे.