केडीएमसीतर्फे महिलांसाठी उभारण्यात आलेल्या एका आगळ्या वेगळ्या प्रसाधनगृहाचे( वाळू पावडर रूम) मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
कल्याण – आजच्या युगात महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात आपली जबाबदारी लीलया पेलत आहेत, या महिलांच्या सुविधेसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महिला आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या संकल्पनेतून कल्याण रेल्वे स्थानक परिसरात, कपोते वाहनतळ च्या आवारात अत्याधुनिक, सुसज्ज असे प्रसाधनगृह (वाळू पावडर रूम ) महिलांच्या सेवेत दाखल करण्यात आले आणि काल सायंकाळी या प्रसाधनगृहाचे लोकार्पण खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार सुलभा गायकवाड आणि आमदार राजेश मोरे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. सदर प्रसाधनगृह हे ग्लोबल स्टार टॉयलेट मानांकन प्राप्त असून, यामध्ये शौचालय स्वच्छता व महिलांची सुरक्षितता यास प्राधान्य देण्यात आले आहे.
सदर वाळू पावडर रुममध्ये ४ स्मार्ट वॉशरूम, बेबीकेअर रुम, चेजींग रुम, सॅनेटरी पॅड वेन्डींग मशीन तसेच फीडींग रुमचा समावेश आहे. सदर वाळू पावडर रूम मध्ये स्वच्छता व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने इंटरनेट ऑपरेटींग सिस्टिम बसविण्यात आलेली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महिलांच्या स्वच्छतेबाबत हमी आहे. या वाळू पावडर रूम मध्ये महिलांची स्वच्छता, सुरक्षितता, वैयक्तीक काळजी बरोबरच महिलांसाठी सौंदर्य उत्पादने देखील ठेवण्यात आलेली आहेत. वाळू या संस्थेचे एक मोबाईल ॲप देखील असून, सदर ॲपवर रजिस्ट्रेशन केल्यावर भारतामध्ये उपलब्ध असलेल्या सुमारे ४० हजार स्वच्छ वाळू पावडर रूम्स ची माहिती व ठिकाण वापरकर्त्यास उपलब्ध होवू शकेल. सदर वाळू पावडर रूम साकारण्यासाठी महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, उपअभियंता योगेश गोटेकर यांनी विशेष प्रयत्न केले.