पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पर्दाफाश, पतीला अटक

Spread the love

पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पर्दाफाश, पतीला अटक

योगेश पांडे/वार्ताहर 

वसई – डॉक्टर डेलिसा परेरा या वसईतील नामांकीत डॉक्टर म्हणून परिचित आहेत. डॉक्टर म्हणून जशी त्यांची ख्याती आहे तसचं त्यांनी मिसेस इंडिया ही स्पर्धाही गाजवली आहे. त्यामुळे वसईत त्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पण सध्या त्या त्यांच्या एका कृतीने चर्चेत आल्या आहेत. ३९ वर्षीय डॉक्टर डेलिस यांनी टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरीच आत्महत्या केली आहे. एका यशस्वी डॉक्टर महिलेने आत्महत्या का केली? त्याचं राज एका चिठ्ठीत बंद होतं. ही चिठ्ठी आत्महत्ये पूर्वी डॉक्टर डेलिसा यांनी चर्चच्या पादरीकडे दिली होती. ती चिठ्ठी ज्या वेळी फादरने डेलिसा यांच्या आईकडे दिली त्यानंतर या संपुर्ण प्रकरणावरचा पडदा उठला. डॉक्टर डेलिसा परेरा या वसईच्या कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात सेवा देतात. त्यांनी रॉयल परेरा यांच्या बरोबर लग्न केलं होतं. त्या पापडीच्या सोनारभाट इथं आपल्या १२ वर्षाच्या मुलीसह राहतात. सोमवारी संध्याकाळी त्या नेहमी प्रमाणे रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाल्या. घरी जाण्या आधी त्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेल्या. प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी पापडी चर्चच्या पादरींना एक लिफाफा दिला. त्यात एक चिठ्ठी होती. तो लिफाफा देवून त्या घरी गेल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळानंतर कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांनी डेलिसा यांनी आपले जिवन संपवले असल्याचे दिसले. त्यांना ते पाहून धक्का बसला.

तोपर्यंत चर्चच्या फादरने त्यांना दिलेली चिठ्ठी डेलिसा यांच्या आईला दिली होती. ज्या वेळी आईने ती चिठ्ठी वाचली त्यावेळी त्यांना धक्का बसला. शिवाय त्या चिठ्ठीच्या माध्यमातून मोठा खुलासाही झाली. आत्महत्येचं काय कारण होतं त्याचीच मिमांसा डेलिसा यांनी या चिठ्ठीत केली होती. पती रॉयल परेरा यांचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. त्यावरून या दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. त्यातून रॉयल परेरा त्यांना शारिरिक आणि मानसिक त्रास देत होता असं या चिठ्ठीत लिहीलं होतं. हे वाचल्यानंतर डेलिसा यांची आई थेट ते पत्र घेत पोलिस स्थानकात दाखल झाली. त्यांनी ती चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात दिली. शिवाय रॉयल याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदवला. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने रॉयल परेरा याला अटक केली आहे. डॉक्टर डेलिस यांनी मिसेस इंडिया या स्पर्धेत ही भाग घेतला होता. ही स्पर्धा त्यांनी गाजवली होती. त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. त्या फिटनेसची फार काळजी घ्यायच्या. त्याच बरोबर वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही त्या आपला सहभाग नोंदवत होत्या. त्या रुग्णालयातही सर्वां बरोबर मिळून मिसळून असत. त्यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी त्या रुग्णालयात आल्या होत्या. नेहमी प्रमाणे त्यांनी रुग्णांना तपासलं होतं. त्या पुढे जावून असं काही भयंकर करणार आहेत याची पुसटतीही कल्पना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आली नव्हती. त्यामुळे ज्यावेळी त्यांच्या मृत्यूची बातमी रुग्णालयात आली त्यावेळी सर्वच जण हादरून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon