पुण्यातून गायब झालेला आमदाराचा नातू ३ दिवसांनी नाशिकमध्ये विचित्र अवस्थेत सापडला; पैसे आणि मोबाईल गायब, रक्त काढल्याचाही दावा
योगेश पांडे/वार्ताहर
मनमाड – गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू सुमित गुट्टे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता. २ जानेवारीला तो एका हॉस्पिटलमध्ये मुलाखत द्यायला पुण्याला गेला होता. त्यानंतर तो अचानक गायब झाला. सुमित गुट्टे हा रत्नाकर गुट्टे यांच्या भाचीचा मुलगा आहे. एका आमदाराचा नातू असं अचानक गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता सुमित गुट्टे सापडला आहे. त्याला एका रिक्षाचालकानं मनमाड पोलीस ठाण्यात आणून सोडलं आहे. पण मागील तीन दिवस सुमित कुठे होता? त्याच्यासोबत नक्की काय घडलं? याचीच कसलीच कल्पना सुमितला नाही. सध्या समित मनमाड पोलीस ठाण्यात असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. गुरुवारी दोन तारखेला सुमित गुट्टे ज्यूपिटर रुग्णालय मुलाखत देण्यासाठी गेला होता. मुलाखत झाल्यानंतर तो रिक्षाने बस स्थानकावर निघाला होता. पण रिक्षात बसल्यानंतर त्याच्यासोबत काय घडलं? याबद्दल सुमितला काहीच आठवत नाहीये. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला सुमित गुट्टे रविवारी मनमाडच्या रेल्वे स्टेशनवर आढळून आला. मला एसटी स्टँड किंवा पोलीस स्टेशनला सोडा, असं त्याने एका रिक्षावाल्याला सांगितलं. त्यानंतर रिक्षाचालकानं त्याची मदत केली आणि मनमाड पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडलं.
आता तो मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये आहे. पण इथं तो कसा आला? याची काहीच कल्पना आपल्याला नाही, असे सुमित सांगतोय. पुण्यात मी मुलाखत द्यायला गेलो होतो. मुलाखतीनंतर बस स्थानकावर जाण्यासाठी मी रिक्षात बसलो. पण त्यानंतर मला काहीच आठवत नाही. मला थेट आजचंच आठवतं. माझ्या शरीराला काहीतरी थंड लागायचं. कुणीतरी माझं रक्त काढून घेतंय, असं वाटायचं, असं सुमितने सांगितलं आहे. शिवाय खिशात २ हजार होते, ते गायब आहेत. माझा मोबाइलही गहाळ झाला आहे, असंही सुमितने यावेळी सांगितलं.
सुमित गायब झाल्यानंतर पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुमितचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. सुमित हा स्वतः घरातून बाहेर पडला आणि पुणे रेल्वे स्टेशनवरील एटीएममधून पैसे काढून तो पुढील प्रवासाठी गेला, असं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून समोर आलं होतं. तसेच शुक्रवारी दुपारी सुमित पुणे स्टेशनवर फिरतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. मात्र त्यानंतर तो कुठे गेला, याचा शोध लागत नव्हता. सुमितला शोधण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र अखेर तीन दिवसांनी सुमित गुट्टे सापडला आहे. आता तीन दिवस तो नेमका कुठे होता? त्याच्यासोबत काय घडलं? याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.