वर्षाच्या सुरूवातीलाच पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम; वांद्रे स्टेशनच्या ओव्हरहेड वायरवर चढला व्यक्ती, रेल्वे पोलीसांनी घेतले ताब्यात
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – वर्षाच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्टेशनवर मोठा ड्रामा पाहायला मिळाला. वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात एक व्यक्ती रेल्वेच्या ओव्हरहेड पोर्टलवर चढला, त्यामुळे ट्रेन काही काळ थांबवण्यात आल्या होत्या. ओव्हरवेड पोर्टलवर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी वांद्रे रेल्वे स्टेशनच्या रुळांवर बरेच जण जमले होते. या व्यक्तीला खाली आणण्यासाठी त्याला काठी आणि बांबूने मारहाणही केली गेली. ओव्हरहेड वायरवरून पडल्यानंतर जखमी होऊ नये, म्हणून रेल्वे रुळांवर उपस्थित असलेली माणसं चादर घेऊन उभी होती. यानंतर व्यक्तीने ओव्हरहेड पोर्टलवरून खाली उडी मारली, आणि लोकांनी त्याला चादरीमध्येच पकडलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. जीआरपी पोलिसांकडून याबाबत पुढील कारवाई सुरू आहे. ही व्यक्ती ओव्हरहेड वायरवर का चढला? तसंच तो शुद्धीत होता का? त्याचं मानसिक संतुलन ठीक आहे का? याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत. पण वांद्रे स्टेशनवर झालेल्या या ड्राम्यामुळे वर्षाच्या सुरूवातीलाच पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.