कारची कंटेनरला धडक, पुण्यात कर्तव्यावरील उपनिरीक्षकाचा अपघाती अंत, कुटुंबावर शोककळा
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – २०२४ ला अलविदा करुन २०२५ वर्षाचे स्वागत संपूर्ण देशभर जल्लोषात करण्यात येत आहे. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये मन हेलावणारी एक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसातील एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू झाला. कर्तव्यावर असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार यांचा रात्रपाळी करून घरी जात असताना अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने पाठीमागून एका कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. गिरनार हे वाकड पोलीस स्टेशनला काम करत होते. मात्र त्यांची बदली महाळुंगे पोलीस स्टेशनला झाली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार हे नववर्षाच्या स्वागतावेळी कुठलीही दुर्घटना घडू नये, म्हणून चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. ते कारमधून निघाले असताना समोरुन उजव्या बाजुने निघालेला कंटेनर अचानक डाव्या बाजूला शिरला. त्यामुळे डाव्या बाजूने चाललेल्या गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोरात धडक बसली.पुढच्या सीटवर बसलेल्या गिरनार यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अचानक झालेल्या या घटनेने पिंपरी चिंचवड पोलिस दलावर शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नववर्षाच्या पहिल्याचा दिवशी अशी दुःखद घटना समोर आल्याने सर्वांचा धक्का बसला आहे. जितेंद्र गिरनार हे आपल्या कर्तव्यावर असताना ही घटना घडली आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा गिरनार यांचा स्वभाव होता. मात्र अचानक ही घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबंवर आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.