हडपसरमधील काळेपडळ भागात हातभट्टीच्या अड्यावर पोलिसांनी छापेमारी; ९ लाखांच्या मुद्देमालसह दोघांना अटक
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – हडपसरमधील काळेपडळ भागात वडाचीवाडी येथील हातभट्टीच्या अड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत तब्बल ४ हजार ३४० लिटर गावठी दारू तसेच दारू तयार करण्यास लागणारे १२ हजार लिटरचे रसायन असा ९ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर, दोघांना अटक केली आहे. जगदीश भैरूलाल प्रजापती – २४ आणि गुलाब संपकाळ रचपूत – ३३ असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक अनिल निंबाळकर यांच्यासह पथकाने केली.
शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. तरीही शहरात छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू असल्याचे वारंवार दिसून येत आहे. यादरम्यान, काळेपडळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अमित शेटे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान वडाचीवाडी येथील वड्यालगत दोघेजण गावठी हातभट्टी दारू गाळण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून या भागात छापा टाकला. त्यावेळी प्रजापती, रचपुत या दोघांना ताब्यात घेतले. येथून पोलिसांनी तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले १२४ कॅन व १२ हजार लिटर कच्चे रसायन, दोन मोबाईल असा ९ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गावठी दारू भट्ट्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना गावठी दारुची विक्री केली जात आहे, आता पोलिसही अशा भट्ट्यांवर लक्ष देऊन आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्याखाली जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील जवळार्जून गावच्या नदी पात्रात बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्याची भट्टी उद्ध्वस्त केली होती. या कारवाईत सुमारे पावणे तीन लाख रुपये किंमतीचे दारू तयार करण्यासाठीचे साहित्य नष्ट करण्यात आले, अशी माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळार्जून गावच्या हद्दीत सालोबा मळ्यात नदीच्या पात्रात झुडपात बेकायदेशीररित्या गावठी दारूभट्टी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी या दारुभट्टीवर छापा टाकला. यावेळी दारू तयार करण्यासाठी लागणारे अंदाजे २ लाख ६० हजार रुपये किंमतीचे दोन लोखंडी पातेले,१३ हजार लिटर कच्चे रसायन, ५२५ लिटर तयार दारू,प्लास्टिक कांड, सरपन आदी साहित्य जप्त केले.