अतिसारामुळे चिमुकलीचा मृत्यू, वेळीच उपचार न केल्याचा आरोप
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – ठाण्यातील बदलापुरात अतिसारामुळे एका अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच घरातल्या ६ मुलांना हा त्रास झाला असून दूषित पाण्यामुळे त्यांना अतिसाराची लागण झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, अंधश्रद्धेतून मुलीला वेळीच उपचार दिले गेले नाहीत, असा संशय व्यक्त केला जातो आहे. बदलापूरच्या सोनिवली परिसरातील आदिवासी वाडीत गौऱ्या मिरकुटे कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरातील ६ मुलांना २ दिवसांपूर्वी अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांच्या घरातील सपना मिरकुटे या अडीच वर्षाच्या मुलीला यात जास्त झाला आणि तिची प्रकृती आणखी बिघडली. त्यानंतर तिला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर कुटुंबातील इतर ५ मुलांनाही उपचारांसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सध्या अतिसाराची साथ सुरू असून अनेक लहान मुलांना जुलाब उलट्या असे त्रास होतायत. हा आजार दूषित पाण्यातून होत असल्यामुळे बदलापूरच्या चिमुकलीचाही मृत्यू दूषित पाण्यामुळेच झाला असण्याची शक्यता आहे.